29 September 2012

पालक हो,

पालक मित्रहो, आर्किटेक्चरच्या क्षेत्रात तुमच्या पाल्याने करियर करायचे ठरविले असल्यास या क्षेत्राला पुढे किती स्कोप आहे, हे करून त्याला / तिला यश, पैसा, प्रतिष्ठा आणि मुख्य म्हणजे आवडीचे काम केल्याचे समाधान मिळेल का, ते काम त्याला / तिला झेपेल का? असे प्रश्न आपल्याला पडले असतील. स्वाभाविक आहे. परंतु कृपया लक्षात घ्या की कोणतेच क्षेत्र हे सरसकट सर्वांसाठी चांगले किंवा वाईट नसते. ज्याला एखाद्या क्षेत्रात रमायला आवडते, झोकून देऊन, तहान - भूक हरपून ते काम करायला आवडते, त्या क्षेत्राचे प्रचंड कुतूहल जागृत होऊन अस्वस्थ करते, अपयशाची तमा न बाळगता त्या क्षेत्रातील एखादे काम आव्हान म्हणून स्वीकारण्यात कमालीचा आनंद मिळतो, त्याला त्या क्षेत्रात भरपूर स्कोप असतो. मग ते क्षेत्र कोणतेही असो. आर्किटेक्चरचेही तसेच आहे. तुमच्या मुलामध्ये तन मन अर्पून स्वतःच्या मेंदूची कल्पकता आणि हाताचे कौशल्य यांचा अपूर्व मेळ घालून नवनिर्मिती करण्याची जर आवड असेल आणि ही नवनिर्मिती जर दृष्य कला म्हणजेच visual arts च्या क्षेत्रातील असेल तर आर्किटेक्चर हे क्षेत्र खास तुमच्या मुलासाठीच आहे, आणि तुमच्या मुलाचा कल आर्किटेक्चरकडे आहे असे समजायला हरकत नाही. आर्किटेक्चरचा पदवी कोर्स यशस्वीपणे पूर्ण केल्या नंतर अनेक विषयांत पदव्युत्तर शिक्षणही घेता येते. परंतु पदवी शिक्षणानंतर लगेच अर्थार्जनाच्या इतक्या संधी येतात की या क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍यांचे प्रमाण अवघे १० टक्के आहे.
परंतु हेही लक्षात असू द्या की आर्किटेक्चरमध्ये केवळ पैसा खूप आहे म्हणून या क्षेत्रात येणार्‍याला हे क्षेत्र मानवेलच असे नाही. आपल्यातील धीर, नियोजनक्षमता व सर्जनशीलता यांची पदोपदी कसोटी पाहणारी कामे अंगावर घेण्याची आवड असणे त्यासाठी आवश्यक आहे. असा गुण अंगी असल्यास तो सहसा लपून राहात नाही. आपल्या मुलाने/मुलीने लहानपणापासून असे गुण दाखवले असल्यास आपल्या लक्षात आले असतीलच. नसल्यास एखाद्या चांगल्या व्होकेशनल गाइडन्स सेंटर मधून यासाठी मार्गदर्शन घेणेही उपयुक्त ठरू शकते.
आणखी एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की ताज्या आकडेवारीनुसार भारतात कार्यरत असलेल्या आर्किटेक्टसची संख्या २६००० आहे. प्रत्यक्ष पाहता सुमारे ६०,००० लोकसंख्येमध्ये एक आर्किटेक्ट असे अतिशय कमी प्रमाण आहे. त्यामुळे चांगल्या आर्किटेक्ट्सना मागणी प्रचंड आहे व भविष्यातील गरज पाहता ही मागणी वाढत जाणारी आहे.
जर एखाद्या विद्यार्थ्यास अनेक क्षेत्रांची करियर करण्याच्या व अर्थार्जन करण्याच्या दृष्टीने तुलनाच करायची असल्यास असे म्हणता येईल की एखादा आयटी पदवीधर सुरुवातीला तुलनेने मोठा पगार मिळवताना दिसेल परंतु कालांतराने त्याच्याबरोबरीने पासआऊट झालेला आर्किटेक्ट खूप पुढे गेलेला दिसेल. अर्थात हे झाले केवळ पैशाच्या मापाने माणसाचे मोजमाप करणार्‍यांसाठी. कला आणि विज्ञान यांचा मिलाफ असणार्‍या या क्षेत्रात गुणवत्तेचे आणि क्षमतेचे किंवा यशाचे व कामच्या समाधानाचे मोजमाप अशा प्रकारे करता येत नाही.आयुष्यात यश, कीर्ती, पैसा, मानसन्मान हे केवळ एका पदवीने मिळतील अशी कोणतीही पदवी नाही. ते मिळवण्याचे कौशल्य प्रत्येकाने विकसित करावे लागते. आर्किटेक्चरचा अभ्यासक्रम हा सर्वव्यापी आहे. यात असंख्य प्रकारची माणसे, त्यांच्या काम करण्याच्या पद्धती, सवयी, गरजा यांचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे यात ते कौशल्य विकसित होते. तेंव्हा या क्षेत्रात काम करण्याची आवड असणार्‍या विद्यार्थ्यांनी जरूर ह्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावा; परंतु तत्पूर्वी पालक व पाल्य यांनी वरील दृष्टीने याबाबत विधायक चर्चा केल्यास सुयोग्य व अचूक निर्णय घेणे सोपे होईल.
आपले काही प्रश्न असतील तर कृपया खालील Post a Comment मध्ये विचारा. उत्तर देण्याचा अवश्य प्रयत्न केला जाईल.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

No comments:

Post a Comment